◼️किसी को कोई फर्क पडा क्या ?...
व्वा छान!
मला वाटलंच तुम्ही हे शेवटचे हत्यार
उचलालच!
पण तुमचा मुख्य प्रश्न...
आप पिछले एक महिने से मंदिर नही गये, किसी को कोई फर्क पडा क्या ?
...हा होता!
लॉकडाऊन मध्ये मंदिर मशिदीच नाहीत तर बऱ्याच गोष्टी बंद आहेत. तरी आपण जगलो.
जसे...
आम्ही माझ्या समाजाच्या आदर्श संतांच्या पुण्यतिथीला त्यांच्या प्रेरणास्थळावर हजारोंच्या संख्येने न जमता यावेळी घरीच आदरांजली वाहिली. काही अडलं?
आमच्या बौद्ध बांधवांनी सुद्धा यावेळी भीम जयंती दीक्षाभूमीवर लाखोंच्या संख्येनी न जमता, गावात मेणबत्ती रॅली न काढता साजरी केली. काही फर्क पडला?
याचा अर्थ असा नाही, की भविष्यात या प्रेरणास्थळांवर आपण जमू नये. जमलंच पाहिजे. आणि नाही जमता आले तर त्यातून होणाऱ्या प्रबोधनाची पर्यायी साधनं प्रत्येकालाच शोधावी लागणार आहेत.
पण संतांना अपेक्षित आणखी काही प्रश्नही आपल्याला विचारता येतील..
या काळात दारू पिली नाही काही अडलं?
(इथे कुणी म्हणतील. नंतर आम्ही रांगा लावून महसूल पुरवला. मग मंदिरांनी तर गर्दी न जमवता पैसे पुरविले.)
पार्ट्या केल्या नाही काही फर्क पडला?
खर्रा खाल्ला नाही, आपण मेलो का ?
(मी चोरून खाणाऱ्या बद्दल बोलत नाही.) लग्नसोहळे काहींनी अन्नाची नासाळी करणारी बफेची मिजासखोर पार्टी न देता उरकले. काही अडलं?
संतांनी आणि भगवान बुद्धांनी सांगितलं आहे मांसाहार करू नका. काहींनी कोरोना काळात भीतीने तो केला नाही. तरी आपण जगू शकतो हा त्यांना साक्षात्कार झाला आहे. मग आता कायमचं सोडणार का?
डान्स बार बंद होते काही अडलं?
मग या साध्या संतांनी सांगितलेल्या आणि मानव जातीसाठी अहितकारक अवैज्ञानिक व्यसने आपण सोडणार आहोत का?
नाही! यावर आपण बोलणार नाही. कारण यातील कित्येक बाबी आपल्या अडचणीच्या असतात ना. खरे तर या व्यसनांच्या नादी लागून आपली पोरं बिघडत आहेत. पण यावर आपली चुप्पी असते. कारण आपणच पितो ना. संतांच्या वचनांचे आपल्या सोयीनुसार वापर करण्याची एक फॅशन आहे.
त्यांची वचनं पावलोपावली आपण सुज्ञ सुद्धा पायदळी तुडवतो. त्यांच्या विचारांच्या हत्या करतो. आणि सारा दोष मंदिरात जाणाऱ्या भक्तांवर टाकून मोकळे होतो. कारण तो युक्तिवाद करण्यासाठी येणार नसतो.
म्हणूनच म्हणतो इथे असले वाद नको.
त्यासाठी आपापल्या छावण्या आहेत.
त्यामुळे आपणही ताणू नका आणि थांबा.
Comments
Post a Comment